बाप

आई म्हणजे सगळ्याच मुलांचा श्वास
असणारच ना कारण तीच तर भरवते तुम्हाला प्रेमाने घास
पण तोच घास तुम्हाला वेळेवर मिळावा म्हणून मी किती  त्रास सहन करतो
कसे कळणार तुम्हाला कारण मी आई नाही मी तुमचा बाप असतो ।।1।।
आई तुमची तुमच्या प्रत्येक चुकीवर तुमचीच बाजू मांडते
आणि तुम्हाला काही झालं कि परत माझ्याशीच भांडते
मी आपलं शांतपणे हे सर्व ऐकून घेतो
आणि हे पाहून तुम्हाला नेहमी मीच चुकीचा वाटू लागतो
तुम्ही कधी पैसे मागितले कि मी नेहमी चार शिव्या देऊन रागाने निघून जातो
पण जाता जाता मीच तुमच्या आईकडे गपचूप पैसे देऊन जातो
तुम्ही नेहमी आईला विचारता बाबा पैसे द्यायचें म्हणलं कि एवढं रडतात का
पण तो पैसा मी कुठून कसा आणतो हे तुम्हाला कधी कळतं का
मला माहित आहे तुमच्या मनात माझ्याविषयी खूप राग भरलेला असतो
कारण मी आई नाही मी तुमचा बाप असतो ।।2।।
मी कितीही आजारी असलो ना तरीही मला सांगता येत नाही
कितीही वाईट वेळ आली ना तरी मनमोकळं रडताही येत नाही
कसे रडणार तुमच्यासमोर मीच तुमची ताकद असतो
आरशात पाहिलं की वेगळा आणि मनात डोकल्यावर मात्र मी वेगळाच दिसतो
खरं तर तुमच्या भविष्यासाठी मी स्वतःच अस्तित्व हरवून बसतो
पण तुम्हाला मी नेहमीच तुमचा दुश्मन वाटतो
मला मान्य आहे मी तुमच्या प्रत्येक चुकीवर रागवतो
पण कधी विचार केलाय का तुम्ही हा माणूस असा का वागतो
कधी विचार करा तुम्हाला हि मी योग्य वाटेल
ज्या दिवशी तुम्ही बाप व्हाल त्या दिवशी हे सर्व काही पटेल
खरंच सोपा वाटतो तुम्हाला पण जगात सर्वात कठीण प्रवास हा माझाच असतो
कारण मी आई नाही मी तुमचा बाप असतो ।।3।।

Comments

Popular Posts